राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा, खेळाडू संकटात डगमगत नाही – प्राचार्य डॉ. किरण सावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
पालघर दिनांक 15 जानेवारी : खेळाडू हा कुठलीही संकट आले तरी डगमगत नाही. मात्र अभ्यासू विद्यार्थ्यास कमी गुण प्राप्त झाले तर तो खचून जातो पण खेळाडूंचे तसे नसते तो धैर्याने आलेल्या संकटास सामोरे जातो तशी जडणघडण खेळाडूची असते. त्यामुळे कला , क्रीडा, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रात खेळाडू यशस्वी होतात असे प्रतिपादन दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे यांनी राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले.
ऑलम्पिक वीर ,खाशाबा जाधव यांच्या, जयंतीनिमित्त आज पालघर मध्ये,१५ जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून ,मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन डॉ किरण सावे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. खाशाबा जाधव हे नाव क्रीडा क्षेत्रातील ऊर्जा आहे. व त्या ऊर्जेचे रूपांतर आपण खेळांमधील पदकांमध्ये करावे.तसेच ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे,असेही सावे यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन व्यक्त केले.
खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच दांडेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सॉफ्ट बॉल, कबड्डी बॅडमिंटन, व्हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा, तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक व पंच यांचा सत्कार देखील करण्यात आला.तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी 15 जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव यांची जयंती निमित्त राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याबाबतचे आवाहन , सुहास व्हनमाने जिल्हा क्रीडा अधिकारी,पालघर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
यावेळी , दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश देशमुख, दांडेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक संतोष चुरी, स त्तू कदम महाविद्यालयाचे प्रीतम घरत , दिगंबर कदम,शुभांगी पाटील, प्रितेश पाटील, राकेश ठाकरे ,उज्वला लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.




