श्रीगोंदा येथील क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
श्रीगोंदा येथे ८.५० कोटींच्या सुविधायुक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
नूतन शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी
अहिल्यानगर : “ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा नैपुण्य आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर नक्कीच चमकदार कामगिरी करू शकतात. श्रीगोंदा येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल,” असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या व सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशा क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा श्रीमती सुनीता खेतमाळीस, तहसीलदार सचिन डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, मुख्याधिकारी पुष्पागंधा भगत, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी उपस्थित होते.
सुमारे ८ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून २ हेक्टर जागेवर हे क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस तसेच कुस्ती व कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर मॅट व प्रशस्त हॉल उपलब्ध असतील. यासोबतच प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंसाठी कपडे बदलण्याचे स्वतंत्र कक्ष, उत्तम प्रकाशव्यवस्था आदी आधुनिक सुविधा येथे पुरविल्या जाणार आहेत.
नवीन शासकीय विश्रामगृहाची पाहणी : – भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, खोल्यांची रचना, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, पार्किंग आणि सभागृह आदी बाबींचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.




