पत्रकार विषयकबार्शीमहाराष्ट्र

ब्रह्माकुमारीज बार्शी सेवाकेंद्रात पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पत्रकार दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बार्शी सेवाकेंद्र यांच्या वतीने आयोजित पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रम राजयोग भवन येथे शनिवार दिनांक १० जानेवारी रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत अत्यंत शांत, सकारात्मक व प्रेरणादायी वातावरणात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राजयोग ध्यान व योगगीताने झाली. काही क्षणांच्या ध्यानानेच उपस्थित पत्रकार बंधू-भगिनींनी अंतःशांती व मानसिक स्थैर्याचा अनुभव घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संगीता दिदी यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी ईश्वराच्या सान्निध्यात एकत्र येण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “हा ईश्वरीय दरबार आहे. येथे शांती, शक्ती व गुणांचा खजाना अनुभवास येतो. ईश्वरीय कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यात प्रसारमाध्यमांचा वाटा अमूल्य आहे,” असे त्यांनी सांगितले. बार्शीतील पत्रकारांच्या सकारात्मक योगदानाचे कौतुक माऊंट आबू व इतर शहरांतील ब्रह्माकुमारी केंद्रांवरही केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात मोहनभाई (केअरटेकर, ब्रह्माकुमारीज बार्शी सेवाकेंद्र) यांनी बार्शीतील ईश्वरीय सेवेचा ऐतिहासिक प्रवास मांडला. “१८ जानेवारी १९७६ रोजी पेरलेल्या बीजातून आज ईश्वरीय सेवेचा वटवृक्ष उभा राहिला आहे. प्रारंभीच्या अडचणी, गैरसमज व टीका असूनही संयम, निष्ठा व सेवाभावाने हे कार्य विस्तारत गेले,” असे त्यांनी सांगितले.

तुलना, टीका व अहंभावापासून मुक्त राहून निमित्त भावनेने सेवा करण्याची शिकवण मिळाल्यामुळे जीवनात असीम समाधान प्राप्त झाल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. सर्वांनी नि:शुल्क राजयोग साप्ताहिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर प्रेरक वक्त्या ब्रह्माकुमारी अनिता दिदी करवा यांनी जीवनोपयोगी व विज्ञानपूरक शैलीत आध्यात्मिक मार्गदर्शन केले. “निरोगी जीवनासाठी जसे नागमोडी हृदयविद्युतलेख आवश्यक असतो, तसेच सफल जीवनासाठी चढ-उतारही आवश्यक आहेत. ब्रह्माकुमारी विद्यालयातील ज्ञान म्हणजे जीवन जगण्याची कला असून योग म्हणजे सर्वांच्या कल्याणाची भावना मनात निर्माण करणे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ईश्वरीय ज्ञान व नियमित योगाभ्यासामुळे कठीण परिस्थितीतही मन स्थिर ठेवण्याची क्षमता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. यानंतर अनिता दिदी करवा यांनी उपस्थित पत्रकारांसाठी गाईडेड मेडिटेशन (निर्देशित ध्यान) घेतले. या ध्यानसत्रात अनेक पत्रकारांनी तणावमुक्ती व असीम शांतीचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणोती कोकाटे यांनी अत्यंत सुयोग्य व प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांचा सुविचारदर्शिका व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर समूह छायाचित्र घेण्यात आले. या कार्यक्रमास बार्शीतील पस्तीस पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थिती होती. हा कार्यक्रम पत्रकारांसाठी केवळ स्नेहमिलन न राहता मनःशांती, सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button