ओंकार हिंगमिरे यांची व्हॉईस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा सचिव पदी निवड
डिजिटल मीडियातील तरुण चेहरा संघटनेच्या नेतृत्वात
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी लाईव्हचे कार्यकारी संपादक ओंकार हिंगमिरे यांची व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड झाली आहे. ही निवड सोलापूर येथे झालेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक संदीप काळे, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ओंकार हिंगमिरे हे आजच्या तरुण पत्रकारांमध्ये एक ठळक नाव आहे. विशेषतः व्हिडीओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीमध्ये त्यांचे विशेष कौशल्य असून, त्यांनी आधुनिक पत्रकारितेला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कमी वयातच त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांशी असलेला त्यांचा सुसंवाद संघटनेसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. परखड लेखनशैली, निर्भीड प्रश्न मांडण्याची क्षमता आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य ओंकार सातत्याने करत आहेत. बार्शी शहरासह परिसरातील अनेक समस्यांवर त्यांनी पत्रकार म्हणून ठाम भूमिका घेतली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार हिंगमिरे यांची सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारितेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




