सोलापुरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धडक कारवाई; २५ जण ताब्यात, २.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले असून, त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या २५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे रु. २ लाख ३१ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांना सातरस्ता परिसरातील इंडीया टी हाऊसच्या बोळात रौफ भंडाले नावाचा इसम जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सपोनि विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाला छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार सातरस्ता येथील इंडीया टी हाऊसच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला असता, त्या ठिकाणी एकूण ३० जण पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी २५ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर पाच जणांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढला.
छाप्यात रोख रक्कम, पत्त्यांचा कॅट, डीव्हीआर, इन्व्हर्टर व लोखंडी कपाट असा एकूण रु. २,३१,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०४६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान हा जुगार अड्डा रौफ भंडाले व रियाज हुंडेकरी हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सपोनि विजय पाटील व त्यांच्या पथकाने केली.




