बार्शीत 10 महिन्यांच्या चिमुकलीच्या खूनप्रकरणी आईविरुद्ध गुन्हा; सहा वर्षांच्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. 20 : बार्शी शहरातील अलीपूर रोड परिसरातील शंभूराजे चौक येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पूजा योगेश खुर्दामळे (वय 26) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 109 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या मूळच्या शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड येथील असून सध्या शंभूराजे चौक, अलीपूर रोड, बार्शी येथे वास्तव्यास आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 19 जुलै) सकाळी 9.35 वाजण्यापूर्वी ही घटना घडली. आरोपी महिलेने तिची 10 महिन्यांची मुलगी शक्ती योगेश खुर्दामळे हिचा गळा दाबून तसेच पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिचा खून केल्याचा आरोप आहे. याचवेळी तिची मोठी मुलगी तेजल योगेश खुर्दामळे (वय 6 वर्षे) हिला बांधून ठेवत तिचा गळा दाबून व तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल लिबाजी लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात दुपारी 1.19 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप तसेच पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी पूर्ण केली. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. एका आईवरच आपल्या 10 महिन्यांच्या मुलीच्या खुनाचा आणि दुसऱ्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असल्याने ही घटना अत्यंत हृदयद्रावक मानली जात असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.




