महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे देशाच्या एकजुटीसाठी अतुलनीय योगदान

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारत देशाला बौद्ध व जैन धर्मांनी अहिंसेची शिकवण दिली. महात्मा गांधीनी सत्य व अहिंसा या तत्वांनी राष्ट्रीय चळवळीत निकराने लढा दिला. लालबहादूर शास्त्री हे गांधीजींच्या आंदोलनांनी प्रभावित होवून देशासाठी तत्पर होते.महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे देशाच्या एकजुटीसाठी अतुलनीय योगदान आहे, असे मत डॉ. राहुल पालके यांनी मांडले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. रामेश्वर कोठावळे, नॅक समन्वयक डॉ. समाधान पवार, डॉ. शशिकांत शिंदे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पालके म्हणाले, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह , दांडी सत्याग्रह, सविनय कायदेभंग व असहकारातून ब्रिटिशांविरोधी लढा दिला. त्यांच्या विचारांतून समकालीन वास्तव प्रकट होते. लालबहादूर शास्त्री यांनी व्यक्तिगत तसेच राजकीय पटलावर नैतिक अधिष्ठान ठेवून उत्कृष्ट कार्य करीत देशाला प्रगतीपथावर आणण्यात मोलाचे योगदान दिले.
प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी गांधी व शास्त्री यांच्या कार्याची समकालीन उपयुक्तता मांडली. समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या विचारांचे उद्बोधन उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यातून सामाजिक सहिष्णुता वृद्धिंगत होते असेही ते म्हणाले. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



