राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सात महसुली विभागातील ३४ जिल्ह्यात एकूण ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. नवीन इमारत बांधण्याकरिता २८७ कोटी ७६ लाख ४४ हजार तर दुरुस्तीसाठी १२१ कोटी ११ लाख ८२ हजार, स्वच्छतागृह साठी २५ कोटी १७ लाख २० हजार, विविध उपकरणे खरेदीसाठी २४ कोटी ३५ लाख ८८ हजार असा एकूण ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत.



