धाराशिवमध्ये ऊस उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर , शेतकऱ्यांना मिळणार अधिक उत्पादन,कमी खर्च
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : जिल्ह्यात ऊस उत्पादनात क्रांती घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.उसाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टरहून अधिक असून, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन वाढवणे,खर्च कमी करणे,पाणी बचत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एआय तंत्रज्ञानाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
कृषी विज्ञान केंद्र,बारामती, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रयोगांतून पुढील फायदे स्पष्ट झाले आहेत. उत्पादनात ४० टक्केपर्यंत वाढ,पाणीवापरात ३० टक्केपर्यंत बचत,उत्पादन खर्चात २५-३० टक्के बचत,पारंपरिक पद्धतीपेक्षा ५०-७० टक्के अधिक नफा,कीड व रोगांविषयी आगाऊ माहिती मिळणे आदि फायदे झाले आहेत.
प्रकल्पाची अंमलबजावणी : या प्रकल्पासाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर खर्च अपेक्षित आहे.यापैकी VSI ९,२५० रुपये,संबंधित साखर कारखाना ६,७५० रुपये तर शेतकऱ्यांचा वाटा ९,००० रुपये असेल.पहिल्या टप्प्यात एक लाख शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. अर्ज ‘पहिले येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर स्वीकारले जातील.
प्राधान्य शेतकरी आणि अटी पुढीलप्रमाणे आहे.ठिबक सिंचनाचा वापर करणारे,एकाच प्रकारची जमीन असलेले गटबद्ध शेतकरी (२५-४० शेतकरी गट),शेतकरी सदस्य असलेल्या कारखान्यांकडे तात्काळ करारनाम्याची प्रत सादर करणे आवश्यक,एआय प्रणालीत हवामान केंद्र आणि मातीतील सेन्सरद्वारे पाणी व्यवस्थापन,अन्नद्रव्य नियंत्रण,कीड व रोग व्यवस्थापन याबाबत अचूक मार्गदर्शन मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये नॅचरल शुगरचे बी.बी. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे तसेच १६ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार यांनी प्रत्येक साखर कारखान्याने किमान २५० शेतकरी आणि २० टक्के क्षेत्र (२०,००० हेक्टर) या प्रकल्पांतर्गत आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. शेतकऱ्यांचे करार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे तात्काळ सादर करून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.




