अमोल लोहार यांना‘व्लॉगर ऑफ द इयर’ पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे,ता.८: नाशिकच्या भूमीत सह्याद्रीप्रेमींना एकत्र आणणारा, साहस आणि निसर्गाच्या साक्षीने भरलेला ‘सह्याद्रीमित्र संमेलन २०२५’ यंदा प्रचंड उत्साहात पार पडले. सह्याद्रीमित्र फाउंडेशन आयोजित या भव्य सोहळ्याला ५ आणि ६ जुलै रोजी नाशिकने साक्ष दिली आणि याच मंचावर एक खास गौरव झाला. या वर्षातील व्लॉगर ऑफ द इयर (द्वितीय क्रमांक) पुरस्कार अमोल विष्णू लोहार यांना प्रदान करण्यात आला.
अमोल लोहार, जे आपल्या ‘शंकर विष्णू vlogs’ या यूट्यूब चॅनेलवरून सह्याद्रीतील थरार, सौंदर्य, गड-किल्ले आणि निसर्गाची अफलातून अनुभूती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत, त्यांच्या या कार्याची दखल या पुरस्काराने घेतली गेली. त्यांच्या व्हिडिओ डायरीमध्ये केवळ कॅमेऱ्याचे सौंदर्य नाही, तर सह्याद्रीचा आत्मा जिवंत होतो!
या गौरवाच्या क्षणी मंचावर उपस्थित होते; ॲड. नितीन ठाकरे, साहसवीर उमेश झिरपे, सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, आणि इतिहास तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर.अमोल लोहार यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, सह्याद्रीप्रेमींना साद घालणारे आहे; की आपणही निसर्ग, इतिहास आणि मातीशी नाळ जोडणारे काही तरी विशेष करू शकतो.



