मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची स्थापना – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

0

कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला होणार सुरुवात

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर चित्रनगरीमधील ४४ कोटींच्या चित्रीकरण स्थळांचे लोकार्पण व भूमिपूजन50000

कोल्हापूर, दि. २८ : चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता तसेच तंत्रज्ञानाची अनेक आव्हानं असून या तंत्रज्ञानाची मागणी जगभर आहे. म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येत्या काळात उभे राहणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या हस्ते कोल्हापूर चित्रनगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या चित्रीकरणासाठी आवश्यक विविध इमारतीचे उद्घाटन झाले. तसेच, पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे, मोरेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कोल्हापूरमधील चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कलाकार, तंत्रज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. शेलार म्हणाले, याच चित्रनगरीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) यांच्या सहकार्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि ऑडिओ-व्हिडिओ यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. आणि या चित्रपट शिक्षण व्यवस्थेची सुरुवात याच वर्षी होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात जन्मलेल्या आणि कोल्हापूरमध्ये येऊन मराठी सिनेमासाठी कार्य केलेल्या कलाकारांनी मराठी सिनेमाची परंपरा समृद्ध केली असल्याचे सांगून त्यांनी अशा कलाकारांचे कलात्मक दालन (संग्रहालय) या ठिकाणी उभारण्याची घोषणाही केली.

महाराष्ट्राची खरी कलानगरी कोल्हापूर असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत १९८५ साली सुरू झालेल्या चित्रनगरीसाठी खऱ्या अर्थाने पुन्हा गती देण्याचे कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नाटक, संगीत, लोककला, लोकवाद्य आणि लोकसंस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. तशीच मराठी सिनेमा ही महाराष्ट्राची जगभरातील ओळख आहे. या दिशेने काम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी दिलेला निधी तसेच आता प्रस्तावित असलेल्या १६ कामांसाठी आवश्यक निधी यासाठी आमदार अमल महाडिक यांनी सर्वात मोठा पाठपुरावा केला असून हे त्यांचे यश आहे असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीला वास्तविक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आमदार अमल महाडिक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. इतर विकासकामांबरोबरच चित्रनगरीलाही गती देणे आवश्यक आहे. ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील. कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने उभी राहील, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.

खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक वर्षांपासूनचे चित्रनगरीचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांचे आभार मानले. ते म्हणाले, चित्रपटसृष्टीचा व्यवसाय वाढत असून रोजगारसंख्याही वाढत आहे, यामुळे कलाकार या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. जिल्ह्यात तयार झालेल्या विविध सुविधा, यामध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि दळणवळणाच्या व्यवस्था यामुळे कोल्हापूरची प्रगती झाली आहे. यामुळे चित्रनगरीचे भविष्यातील महत्त्व निश्चितच वाढणार आहे. आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीच्या उभारणीसाठी अनेक मान्यवरांचे योगदान लाभल्याचे सांगून, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सहकार्याने पुणे, मुंबई यासह रामोजी फिल्म सिटीपेक्षा अधिक चांगली आणि सुसज्ज चित्रनगरी कोल्हापूर येथे उभी राहत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यांनी केले. नागरिकांना लोकार्पण दिनी कोल्हापूर चित्रनगरी पाहण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक पर्यटक प्रेमींनी गर्दी केली.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

चित्रनगरीत बांधण्यात आलेले मंदिर (१.४४ कोटी), चित्रीकरणासाठी बांधण्यात आलेला वाडा (४.७० कोटी), चित्रीकरणासाठी आवश्यक चाळ (३.१६ कोटी), चित्रनगरीतील नवीन टॉक-शो स्टुडिओ बांधकाम (५.६९ कोटी), चित्रीकरणासाठी आवश्यक रेल्वे स्टेशन, चित्रीकरणासाठी आलेल्या मनुष्यबळासाठी बांधण्यात आलेले वसतिगृह या इमारतींचे लोकार्पण झाले. तसेच, पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओसाठी दुमजली इमारतीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या सर्व कामांची एकूण किंमत ४४ कोटी रुपये इतकी आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या