आणीबाणीच्या 50 वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या सन्मानपत्राचे वितरण, आणीबाणीच्या घटनाक्रमावर आधारीत चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ, दि. 25 : देशात आणीबाणी लागण्याच्या घटनेला 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्यावतीने प्राप्त सन्मानपत्राचे वितरण अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच आणीबाणीच्या घटनाक्रमावर आधारीत लावण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन देखील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सन्मानपत्र वितरण व प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आंदोलनात सहभागी पेंशनर्सच्या लोकतंत्र बचाव सेनानी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणलाल खत्री, तहसिलदार श्रीमती मोरे, नायब तहसिलदार वकीला मस्के, वंदना वासनिक तसेच आंदोलनात सहभागी अनेकजन उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणीबाणीच्या आंदोलनात सहभागी होऊन कारावास भोगलेल्या आंदोलकांच्या सन्मानार्थ चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. भारतामध्ये 25 जुन 1975 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींनी कारावास भोगला त्यांच्या सन्मानार्थ चित्रप्रदर्शनीचे आयोजन करुन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्राप्त सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात आंदोलनात सहभागी 71 व्यक्तींना पेंशन दिली जाते. त्यापैकी आज कार्यक्रमास उपस्थित 34 व्यक्तींना सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, लक्ष्मणलाल खत्री यांनी मनोगत व्यक्त केले. आणीबाणीच्या आठवणी श्री.खत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या. 25 जुन 1975 रोजी घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात काही व्यक्तींनी प्रत्यक्षपणे तर काहींनी आपल्या लेखनीतून सहभाग नोंदविला. यामध्ये जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग होता. त्यातील 71 व्यक्तींना पेंशन दिली जाते. राज्य शासनाच्यावतीने 2018 पासुन सन्मान निधी म्हणून पेंशन देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचलन व आभार भारती झाडे यांनी केले.