नवी दिल्लीमहाराष्ट्र

भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले, दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, 23 : भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. 18 ते 20 जून 2025 या कालावधीत रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.

सानवी ही पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथील इयत्ता 6 वी मधील विद्यार्थीनी असून ती आंबेडकर नगर, भुसावळ येथे राहते. तिने आपल्या वयोगटातील प्रतिस्पर्धी थायलंडच्या खेळाडूंना मागे टाकत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. तिच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भुसावळसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे.

सानवीच्या यशामागे तिचा कठोर परिश्रम तर आहेच, पण तिचे प्रशिक्षक पीयूष दाभाडे, दीपक सोनार सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि तिचे पालक – आई ज्योती सोनवणे व वडील डॉ. आनंद सोनवणे यांचे सातत्याने दिलेले प्रोत्साहनही कारणीभूत ठरले. उच्चशिक्षित असलेल्या सानवीच्या पालकांनी तिला खेळात करिअर करण्यासाठी सर्वतोपरी साथ दिली.

मागील वर्षी सानवीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करत 1 सुवर्ण व 2 रौप्य पदकं मिळवली होती. तिच्या या उल्लेखनीय यशासाठी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री दत्तात्रय बारणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, तसेच केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तिला प्रशस्तिपत्र देऊन गौरविले होते. सानवीच्या या यशामुळे देशातील इतर युवक-युवतींनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button