आरोग्यमहाराष्ट्रसातारा

घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानातील महिला रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करावेत – जिल्हाधिकारी अशोक काकडे

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली : घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानात विविध आजारांचे निदान झालेल्या 719 महिला रूग्णांना जिल्ह्यातील रूग्णालयांत संदर्भित करण्यात आले आहे. या महिला रूग्णांवर आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया व उपचार संपूर्णतः मोफत करावेत व त्यांचे आरोग्य जपण्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियान आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे चंद्रकांत साळुंखे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील समन्वयक सचिन पाटील, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालयाचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांच्यासह धर्मादाय रूग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालयांचे डॉक्टर्स व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियान 14 मे रोजी घेण्यात आले. या अभियानात त्या दिवशी जिल्ह्यातील अडीच हजारहून अधिक घरेलु कामगार महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 719 महिला रूग्णांना विविध आजारांचे निदान झाले असून, त्यांना धर्मादाय रूग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया व उपचार याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

संदर्भित महिला रूग्णांची आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत करावे व त्यांना आजारातून मुक्त करावे, अशा सूचना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, घरेलू कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, या महिलांचा आरोग्य प्रश्न दुलर्क्षित न करता प्राधान्याने त्यांना आरोग्य सेवा द्यावी. बऱ्या झालेल्या रूग्णांचा 2 ऑक्टोबरला आनंद मेळावा घेण्यात येणार आहे. याचा सांगली पॅटर्न व्हावा, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात अवयवदान चळवळ सुरू करण्यात आली असून, यासाठी तयार करण्यात आलेला क्यू आर कोड प्रत्येक रूग्णालयाने दर्शनी भागात लावावा. तसेच, वड, पिंपळ व आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करावे, असे ते म्हणाले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी घरेलु कामगार महिलांच्या आरोग्य सुविधांत कोणतीही कसूर ठेवू नये, असे स्पष्ट करून सहभागी रूग्णालयांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button