अहमदाबाद – लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त

महाराष्ट्राची जनता दुःखात सहभागी, मदतीसाठी सर्व यंत्रणाना सज्जतेचे निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई, दि. १२ : अहमदाबाद लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, अहमदाबाद-लंडन या विमानाची झेप ही अनेकांसाठी अंतिम ठरली. रहिवासी परिसरात हा अपघात झाल्याने या अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताने देश दुःखात बुडला असून, विमानातील प्रवाशी, विमानातील अधिकारी-कर्मचारी, अपघातग्रस्त परिसरातील नागरिक यांच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावर राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने संबंधित यंत्रणांना निर्देशित केले आहे.