राऊत यांच्या एस. आर. एंटरप्रायझेस कडून 5.11 लाखांत बेवारसा वाहनांचा लिलाव खरेदी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत पडून असलेल्या वाहने अखेर लिलाव प्रक्रियेद्वारे हटविण्यात आली आहेत. आज दिनांक २२ मे रोजी, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या वाहनांचा जाहीर लिलाव पार पडला. एकूण १५३ वाहनांचा समावेश असलेल्या या लिलावात १२३ दुचाकी, १९ रिक्षा आणि ११ चारचाकी वाहने होती. संबंधित वाहनांचे आरटीओमार्फत व्हॅल्युएशन अंदाजे 4,98,300 रुपये एवढे करण्यात आले होते.
या लिलावात एकूण ३५ व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. लिलावाची सुरुवात 5 लाख रुपयांपासून करण्यात आली. अंतिम बोली 5,11,000 रुपये इतकी लागली असून, बार्शी येथील एस. आर. एंटरप्रायझेसचे मालक सुरज राऊत यांनी ती जिंकली.
या लिलाव प्रक्रियेसाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेचा सहकार्य लाभला. लिलाववेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, नायब तहसीलदार सानप, तहसील कार्यालयातील क्लार्क नाल्पे, दोन पंच अधिकारी, तसेच स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते.
संपूर्ण लिलाव प्रक्रिया पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल, आणि पोलीस निरीक्षक बार्शी शहर बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या लिलावाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कदम, तसेच वाहतूक शाखेच्या टीमने विशेष मेहनत घेतली.
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे नियोजनबद्ध लिलाव आयोजित होणे ही एक सकारात्मक बाब असून, भविष्यातील अशा उपक्रमांना गती मिळण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.