राज्यस्तरीय कुस्तीचा धसपिंपळगाव आखाडा , महाराष्ट्र केसरी घडवणारी संधी, लाखोंच्या रोख बक्षिसांसह नामवंत मल्लांची चितपट कुस्ती!”

0

राज्यभरातील नामवंत मल्लांची घमासान कुस्ती – धसपिंपळगावचा आखाडा सज्ज!

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : धसपिंपळगाव (ता. बार्शी) – विठ्ठल बिरुदेव यात्रेनिमित्त आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या साक्षीने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला उजाळा देणारी आणि नव्या मल्लांना संधी देणारी एक भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा धसपिंपळगाव येथे रंगणार आहे. पारंपरिक मातीच्या आखाड्यात ही लढत १४ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.

या कुस्त्यांचे विशेष आकर्षण म्हणजे, महाराष्ट्राच्या आखाड्यात नावलौकिक मिळवलेले पै. सचिन (बापू) धस यांनी स्वतःच्या संकल्पनेतून आणि समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातली कुस्ती संस्कृती जपणं, नव्या पिढीला व्यासपीठ मिळवून देणं आणि गावकुसाबाहेरही पिंपळगावचं नाव घुमवणं, हा या कुस्ती महोत्सवामागचा मुख्य हेतू आहे.

कुस्ती हा केवळ खेळ नसून तो मातीशी असलेला नाळेचा दुवा आहे. त्याच मातीतून उगम पावणारे भावी महाराष्ट्र केसरी या मंचावर आपली ताकद दाखवतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या कुस्तीसाठी लाखोंच्या रोख रकमेची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत, जे मल्लांना प्रेरणादायी ठरणार आहेत. यासोबतच बाहेरगावाहून येणाऱ्या सर्व पैलवानांची खाण्या-पिण्याची आणि निवासाची संपूर्ण व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे – ही बाब ही स्पर्धा अधिक आगळी ठरवते.

महादेव मंदिर परिसरातील मातीचा अख्खा आखाडा या दिवशी रणांगणात रूपांतरित होणार असून, मल्लांची गर्जना आणि शिट्यांचा निनाद धसपिंपळगावच्या आभाळात घुमणार आहे. पंचक्रोशीतील नागरिक, कुस्तीप्रेमी, गावातील महिला, वृद्ध, आणि तरुण मंडळींसाठी ही संधी एक पर्वणी ठरणार आहे. अनेक वर्षांपासून गावाने जपलेली कुस्ती परंपरा या महायुद्धाच्या निमित्ताने नव्या उंचीवर पोहोचणार आहे.

या कुस्ती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब धस (संस्थापक, जन्मभूमी प्रतिष्ठान), अण्णासाहेब धस (उपसरपंच), शशिकांत जगदाळे (भगवंत ब्लड बँक ), ज्ञानेश्वर बापू भालेकर, शरद जगदाळे, अण्णासाहेब पाटील, मंथन कोळेकर (पाटील), विश्वजीत ठोंगे (पोलीस), अमरदीप धस, बापू लगड, सलीम मुलाणी, बापू लवटे, धनाजी वाघमोडे, दादा कसबे, दादा वीर, संजय वीर, विलास धस, प्रसाद जगदाळे, अमर धस, सतीश जगदाळे, रामभाऊ गरड, सागर भोळे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

धसपिंपळगावची ही कुस्ती म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर एक संस्कृतीचा उत्सव, परंपरेचा सन्मान आणि छत्रपती संभाजी महाराज व विठ्ठल बिरुदेव यात्रेच्या गौरवाचा जागर आहे. त्यामुळे कुस्तीप्रेमींनी, नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून मातीच्या या रणसंग्रामाची साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या