महाराष्ट्रयवतमाळ

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात , १५६ उमेदवारांची प्राथमिक तर ३६ उमेदवारांची अंतिम निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दाते महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात १५६ उमेदवारांची प्राथमिक तर ३६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

रोजगार मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे विनायक दाते उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, उपप्राचार्य प्रा.डॉ.तारांचंद कंठाळे, समन्वयक प्रा.संजय त्रिवेदी, सहायक आयुक्त प. भ.जाधव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सि. रा. खिरोडकर व मार्गदर्शक म्हणून गणेश सव्वलाखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यामध्ये वैभव एन्टरप्रायजेस, नागपूर, विनय टिव्हीएस, रेमण्ड युको डेनिम प्रा.लि., स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लि. अमरावती, मेडि असिस्ट इन्सुरन्स टिपीए प्रा. लि., संसूर सृष्टी एन्टरप्रायजेस, हिमालया ईत्यादी कंपनी, उद्योजक सहभागी झाले होते. या कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण ४७७ रिक्त पदांकरिता मुलाखती घेण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती.

मेळाव्याचे आयोजन सहायक आयुक्त प. भ. जाधव आणि प्राचार्य. डॉ. राजेश सिंगरू यांनी केले होते. मेळावा कार्यक्रमाचे प्रस्ताविक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले. मेळाव्यामध्ये गणेश सव्वालाखे यांनी विद्यार्थ्यांना रोजगार वाटा कशा प्रकारे तयार करून घ्याव्या लागतात व रोजगाराच्या चालुन आलेल्या संधीचा कशा प्रकारे सोनं करून घ्यावे, या बाबत उत्स्फूर्त क्रियाशिल मार्गदर्शन केले.

मेळाव्याला जिल्ह्यातील ३७५ उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यापैकी १५६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून ३६ उमेदवारांची अंतिम निवड सुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ तसेच इतर मागासवर्गीय विकास महामंडळाचे समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते. समन्वयक प्रतिनिधींनी उपस्थित उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button