बार्शी शिवसृष्टीतील ऐतिहासिक घटनांचा अभाव; शिवराज्य सेनेचे आक्रमक आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपरिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवण्यात आले आहेत. मात्र, अफझल खान वध व लाल महालातील शाहिस्तेखानाच्या बोटांचे छाटणे या ऐतिहासिक घटनांचा समावेश न केल्याने संतप्त शिवप्रेमी आणि शिवराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज नगरपरिषदेवर आक्रमक आंदोलन छेडले.
हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा वध आणि लाल महालात घडलेला ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक या घटना संपूर्ण देशाच्या इतिहासात अभिमानास्पद ठरल्या आहेत. आज जगभरातील सैन्यदल आणि युद्धनीती अभ्यासक या लढायांचे सखोल अध्ययन करतात. मात्र, बार्शी नगरपरिषद शिवसृष्टी उभारताना या प्रसंगांचा समावेश करण्यास विसरली, असा आरोप शिवराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.
शिवराज्य सेनेच्या वतीने आज नगरपरिषद कार्यालयावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. हजारो शिवप्रेमींनी एकत्र येत संतप्त घोषणाबाजी करत नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाब विचारला. ‘छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला अन्याय का?’, ‘शिवसृष्टीत अफझल खान वध दाखवलाच पाहिजे!’, ‘शाहिस्तेखानाच्या पराभवाचा इतिहास दाखवणार कोण?’ अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
बार्शी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि शिवराज्य सेनेच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या चर्चेत मुख्याधिकाऱ्यांनी शिवराज्य सेनेच्या मागणीची दखल घेत शिवसृष्टीत वगळलेल्या ऐतिहासिक घटनांचा समावेश करण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शवली. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शिवरायांच्या इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचे पुस्तक भेट देत निषेध नोंदवला. ‘या पुस्तकातही महाराजांचा पराक्रम आहे, मग शिवसृष्टीत का नाही?’ असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
या आंदोलनात शिवराज्य सेनेचे प्रमुख हर्षवर्धन पाटील, प्रितम मोरे, आकाश राऊत, संतोष कोंढरे, राज जगताप, आदित्य कापसे, सोपान डोईफोडे, सागर हांडे, युवराज ढगे, श्रेयस परदेशी, महेंद्र देवकर, विवेक भागवत, निखिल बारसकर, सागर पवार, अमोल देशमाने, विनोद बुराडे, संदीप पाटील, शशी केमदारने, सुमित कुडगावकर आदींसह असंख्य शिवभक्तांनी सहभाग घेतला.
शिवराज्य सेनेच्या आंदोलनानंतर नगरपरिषदेने सकारात्मक भूमिका दर्शवली असली, तरी शिवसृष्टीत या ऐतिहासिक घटनांचा समावेश प्रत्यक्ष कधी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवराज्य सेनेने दिला आहे.