सुर्डी बँक दरोडा, पोलिसांच्या जलद कारवाईला यश, तिघे पिस्टलसह गजाआड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील सुर्डी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेत भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न झाला. मात्र, बार्शी पोलिसांनी वेळीच कारवाई करत अवघ्या तासाभरातच तिघा दरोडेखोरांना पिस्टलसह अटक केली. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच दरोडेखोरांनी बँकेत घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्यावर, दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि कोरफळे भागात दरोडेखोरांचा माग काढत त्यांचा पाठलाग केला.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध कारवाई करत तीघा दरोडेखोरांना पिस्टलसह अटक केली. या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय उंदरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, सागर शेंडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली.
या दरोड्याचा तपास आणि आरोपींच्या अटकेसाठी संपूर्ण पोलीस टीमने संघटितपणे केलेल्या प्रयत्नांमुळेच तासाभरात आरोपींना अटक करणे शक्य झाले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे सुर्डी परिसरात भयमुक्त वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या प्रभावी कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
सध्या अटक केलेल्या दरोडेखोरांकडे चौकशी सुरू असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दरोड्याच्या मागील पार्श्वभूमीचा तपास सुरू असून, आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.