जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन

B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी मुंबई : स्वच्छ शहराचा बहुमान वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस विविध संस्थांचेही महत्वपूर्ण योगदान लाभत असते. अशाच प्रकारचा ‘रन फॉर क्लिन नवी मुंबई (चला धावूया स्वच्छ नवी मुंबईसाठी)’ हा एक अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने डॉ. डि वाय पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या वतीने ‘घे भरारी’ शिर्षकांतर्गत राबविण्यात येत आहे.
8 मार्च 2025 रोजी, सकाळी 6.30 वाजता, सायन पनवेल महामार्गा नजिकच्या सर्व्हीस रोडवर असलेल्या डॉ. डि वाय पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशव्दारापासून या महिला मिनी मॅरेथॉनला प्रारंभ होणार असून 5 कि.मी. अंतराच्या या मिनी मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणारी ही मिनी मॅरेथॉन धावण्याचे महत्व अधोरेखीत करीत आरोग्यपूर्ण जीवनाची गरजही सांगणार आहे.
या महिला मिनी मॅरेथॉनव्दारे स्त्री सक्षमीकरणाचा गौरव केला जाणार असून त्यासोबतच स्वच्छ व हरित नवी मुंबईला चालना मिळणार आहे. घरापासूनच कचरा वर्गीकरणातून अधिक शाश्वत व सर्व समावेशक भविष्याकडे वाटचाल करताना स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजविणारी ही मॅरेथॉन असणार आहे.
घे भरारी या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी 8097109241 / 8369275667 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.