अखेर बार्शीत प्रथमच तृतीयपंथी झाले ‘संगांयो’ चे लाभार्थी वायकुळे यांच्या पुढाकाराने मिळाला लाभ

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : गेल्या अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर बार्शीच्या इतिहासात प्रथमच येथील तृतीयपंथी संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे लाभार्थी झाले असून त्यांना आता शासनाचे मासिक मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहसीलदार एफ.आर. शेख यांच्या सहकार्याने व तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळाला आहे.
निराधारांसाठी शासनाने संजय गांधी निराधार पेन्शन योजना सुरु केली. अनेक निराधार याचे लाभार्थी झाले. तृतीयपंथी समुदाय यामध्ये समाविष्ट नव्हता. तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मदतीने तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या उपस्थितीत सचिन वायकुळे यांनी या समुदायाची बैठक घेऊन आवश्यक ती कागपदत्रे जमा केली. यानंतर यासंबधीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाला सादर केले.
कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संजय गांधी योजनेच्या समितीची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यात ४ तृतीयपंथीयांना ही पेन्शन योजना तहसील कार्यालयाने मंजूर केली. यासाठी संजय गांधी योजनेचे काम पाहणारे राजेंद्र मुंढे तसेच मंडलाधिकारी प्रशांत कोरके, तलाठी महेश गरड यांनीही वेळ काढून सहकार्य केले. तत्पूर्वी निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्या सहकार्याने तृतीयपंथी मतदान नोंदणी अभियान यशस्वी झाले होते.
दरम्यान, बार्शीत प्रथमच तृतीयपंथीयांना संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ मिळाला असून त्यांना आता मासिक मानधन सुरु झाले आहे. तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वायकुळे यांनी गेल्या आठ वर्षांपासून या समुदायासाठी समर्पित काम केले आहे. याचा परिणाम म्हणून आता शासकीय याजनेचे ते लाभार्थी ठरले आहेत.
तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न : तहसीलदार शेख
तृतीयपंथी समुदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण कर्तव्य पार पाडत आहोत. बार्शीतील तृतीयपंथीयांना संजग गांधी योजनेचा लाभ मिळवून देणे याचाच भाग आहे. हा समुदाय मुख्य प्रवाहात यावा यासाठी यापुढच्या काळातही आपले प्रयत्न असतील.
एफ.आर. शेख, तहसीलदार, बार्शी