परभणीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील एकही गरजू लाभार्थी घरकूलापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

घरकुलांच्या मंजुरीपत्रांचे लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : राज्य शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग महिलांना प्राधान्याने प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेपासून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, नरेगा गट विकास अधिकारी जयंत गाडे, एनजीओ सदस्य भरत कच्छवे उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून 1 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. दीनदयाळ योजनेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अत्यंत गरजू व्यक्तीला पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. चूकीच्या पध्दतीने घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्याही सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजुरी पत्र यावेळी देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 (2024-25) अंतर्गत जिल्ह्याला 52179 घरकुलाचे उद्दिष्ट देण्यांत आले आहे, त्यापैकी 44861 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर आजच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील 23 हजार 420 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या लाभांचे वितरण करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरीपत्र व किमान 10 लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रमाचे पुणे येथून थेट प्रक्षेपन व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे यावेळी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button