सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील महेश पाडूळे यांची आत्महत्या – आत्महत्येचे कारण अस्पष्ट

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी महेश जोतीराम पाडुळे (वय ४५) यांनी बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास वैराग येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली असून त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महेश पाडुळे हे मुळचे आंजनगाव (ता. माढा) येथील रहिवासी होते. सध्या ते वैराग येथे कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी सकाळी महेश पाडुळे यांनी गळफास घेतला आणि त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वैराग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉ. सागर शिंदे यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

महेश पाडुळे यांनी वर्षभरापूर्वी वैराग पोलीस ठाण्यात सेवा दिली होती. आणि नंतर त्यांची बदली सोलापूर पोलीस मुख्यालयात झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व वडील असा कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेने कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी तसेच पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

घटनेची नोंद वैराग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.मयताचे शवविच्छेदन बार्शी येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आले आणि त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी आंजनगाव (ता. माढा) येथे पार पडले.

महेश पाडुळे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस प्रशासन, कुटुंबीय तसेच मित्रमंडळी या बाबत विविध शक्यता तपासत आहेत. सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू केला आहे.

या घटनेने पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचार्यांमध्ये वाढत्या मानसिक तणावाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कामाच्या तणाव, कुटुंबीयांशी वेळ न मिळणे आणि मानसिक दबावामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागते.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तज्ज्ञांची मदत, नियमित समुपदेशन, कामाचा लवचिक तास प्रणाली व अन्य उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे. पोलीस कर्मचार्यांच्या मानसिक तणावामुळे होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

महेश पाडुळे यांच्या कुटुंबाला या दुःखद घटनेबद्दल पोलीस प्रशासनाने तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. त्यांच्या आत्महत्येने पोलिस दलात एक मोठा धक्का दिला आहे आणि या घटनेची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या