मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

प्रत्यक्ष शेतात जाऊन तहसीलदारांनी सोडवला रस्त्याचा प्रश्न; शेतकऱ्यांकडून कौतुक
B1न्यूज मराठी नेटवर्क
तहसीलदार शेख यांच्या मध्यस्थीने मालवंडीतील शेतरस्ता खुला; २०० शेतकऱ्यांना दिलासा
बार्शी : बार्शी तालुक्यातील मालवंडी रस्त्यावरील गट क्रमांक 25/31 ते 55/57 या सर्वे रस्त्याच्या अडथळा प्रकरणी आज बार्शी तहसीलदार एफ. आर. शेख यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. सर्व संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेत प्रत्येक बांधाच्या दोन्ही बाजूंनी सहा-सहा फूट जमीन सोडून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास सर्व शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली.
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सुमारे २०० शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार असून शेतीकामासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. संबंधित रस्ता हा चंद्रकांत सावंत, धनंजय बावणे, दिगंबर चिकणे, विठ्ठल बावणे, रमेश चिकणे, तुकाराम सावंत आणि विठ्ठल मचाले यांच्या शेतामधून जात असून हा पारंपारिक रस्ता काही कारणास्तव बंद होता.
तहसीलदार एफ. आर. शेख यांनी उन्हात फिरून प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. कोणाचाही अपमान न करता सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय दिल्याने शेतकऱ्यांमधील गैरसमज, भांडणे व तंटे दूर झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून तहसीलदार शेख यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
सदर पंचनाम्यावेळी तलाठी अण्णासाहेब नटवे, पोलीस पाटील बाळकृष्ण, कमलेश चौधरी, ग्रामपंचायत सरपंच तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांतील तंटा मिटवत तहसीलदार शेख यांनी खुला केला सर्वे रस्ता
बार्शी तहसील प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत तहसीलदार एफ. आर. शेख यांचे आभार मानले.




