कृषीछत्रपती संभाजीनगरपुरस्कारमहाराष्ट्र

कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू;शेतकऱ्यांना घरबसल्या अर्जाची सुविधा

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विविध कृषी पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाईन संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. आता शेतकऱ्यांना पारंपरिक ऑफलाईन पद्धतीऐवजी कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘कृषी पुरस्कार’ टॅबमध्ये जाऊन घरबसल्या ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था आणि गटांनी सन २०२५ पासूनच्या विविध कृषी पुरस्कारांसाठी संगणक प्रणालीद्वारे तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी केले आहे.

यापूर्वी कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन स्वरूपात सादर करावे लागत होते. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी खर्च येत असल्याने अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. तसेच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी आणि संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे.50000या संगणकीय प्रणालीद्वारे पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करणे, तपासणी, मूल्यांकन आणि अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.

ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार आहे. तसेच ऑफलाईन चार प्रतींमध्ये प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज भासणार नाही. अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे याची माहितीही शेतकऱ्यांना सहज मिळू शकणार आहे. छपाई, झेरॉक्स, प्रवास आणि पोस्टाचा खर्च कमी होऊन आर्थिक भारही कमी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन आणि कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था आणि गटांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button