अरुण कापसे यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्रातील ग्राहक सहकार क्षेत्रातील शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन, मुंबईच्या उपाध्यक्षपदी अरुण कापसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि सातत्यपूर्ण योगदानाची ही महत्त्वाची दखल मानली जात आहे.
फेडरेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कापसे यांची प्रथम बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार तसेच प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.
या बैठकीत विठ्ठल नाना भोसले यांची अध्यक्षपदी, तर अरुण कापसे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी काळे उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर, सिद्धार्थ कांबळे आणि प्रसाद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुण कापसे हे मागील २५ वर्षांहून अधिक काळ फेडरेशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
सहकार क्षेत्रातील विविध पातळ्यांवर त्यांनी सातत्याने जबाबदाऱ्या सांभाळल्या असून २०१४ साली त्यांनी फेडरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. ग्राहक सहकार संस्थांचे सक्षमीकरण, वितरण व्यवस्थेतील सुधारणा आणि सहकारी संस्थांमधील समन्वय या विषयांवर त्यांनी केलेले काम सहकार क्षेत्रात उल्लेखनीय मानले जाते.
राज्यातील ग्राहक सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे, धोरणात्मक निर्णय घेणे आणि सहकार चळवळीला दिशा देणे या दृष्टीने फेडरेशनची भूमिका महत्त्वाची आहे. अशा संस्थेच्या उपाध्यक्षपदी दीर्घ अनुभव असलेल्या कापसे यांची निवड झाल्याने फेडरेशनच्या कामकाजाला अधिक स्थैर्य आणि गती मिळेल, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.




