क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत वृद्ध महिलेचा दागिन्यांच्या लोभातून खून लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या देऊन हत्या

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहरात एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, दागिन्यांच्या लोभातून ओळखीच्या व्यक्तीनेच हा खून केल्याचे समोर आले आहे. याबाबत शशिकांत किसन वायकुळे (वय ६४, रा. उपळाई रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संशयित आरोपी चांगदेव पाटील याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, त्यांची चुलत बहीण सौ. गंगुबाई कालीदास गडदे (वय ७३, रा. हांडे गल्ली, कचेरी रोड, बार्शी) या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरातील भाडेकरूंमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. दि. २५ मार्च २०२६ रोजी गंगुबाई या घराला कुलूप लावून कोणालाही न सांगता निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने २७ मार्च रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार (क्र. ४२/२०२६) दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान, स्थानिक सीसीटीव्ही फुटेजमध्ये गंगुबाई या संशयित चांगदेव गोवर्धन पाटील (रा. हत्तीज, ता. बार्शी; सध्या पवार बिल्डिंग, शिवाजीनगर) यांच्या पाठोपाठ इमारतीत जाताना दिसून आल्या. मात्र त्या परत बाहेर येताना दिसल्या नाहीत. याचदरम्यान संबंधित सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाल्याचेही आढळून आले.50000गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगिरी – बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रगटीकरण पथकातील पोलीस हवालदार अमोल माने, प्रवीण साठे, सचिन देशमुख, राहुल उदार, अंकुश जाधव, बाळकृष्ण मुठाळ, अविनाश पवार, उघडे हे बेपत्ता महिलेचा शोध घेत होते. पोलिसांनी संशयिताचा शोध घेत असताना अखेर त्याला २ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे.

संशयित चांगदेव पाटील याने शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीमुळे पैशांची गरज असल्याने गंगुबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी कट रचला. दि. २५ मार्च रोजी त्याने गंगुबाई यांना आपल्या घरी बोलावून लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर टॉवेलने नाक दाबून त्यांचा खून केला. यानंतर मृतदेह एका काळपट रंगाच्या पिशवीत भरून आपल्या कार (हुंदाई वेरना, क्रमांक MH-20 CS 8937) मधून नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विल्हेवाट लावल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button