सचिन वायकुळे लिखित ‘नेतृत्व विकास आणि जनसंपर्क’ ग्रंथाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील लेखक सचिन वायकुळे लिखित ‘नेतृत्व विकास आणि जनसंपर्क’ या ग्रंथाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन पब्लिक रिलेशन अँड लीडरशिप डेव्हलपमेंट’ या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर याठिकाणी मास कम्युनिकेशन विभागामार्फत व कौशल्य विकास केंद्रांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन पब्लिक रिलेशन अँड लीडरशिप डेव्हलपमेंट’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहे.या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नसल्याने लेखक वायकुळे यांच्या ‘नेतृत्व विकास आणि जनसंपर्क’ या ग्रंथाला मान्यता देत विद्यापीठाने याचा वरील अभ्यासक्रमात समावेश केला आहे.
पत्रकारिता आणि जनसंज्ञापन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी दिलेल्या अभिप्रायास अनुसरून वरील ग्रंथास ही मान्यता देण्यात येत आहे, असे कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ.प्रभाकर कोळेकर यांनी दिलेल्या मान्यतेच्या पत्रात म्हटले आहे. कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनने या ग्रंथाची छपाई केली आहे. यापूर्वी वायकुळे यांचा ‘पत्रकारिता: शोध आणि बोध’ हा ग्रंथदेखील विद्यापीठ अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे.