स्कॉर्पिओतून विदेशी दारु वाहतूक होतांना पकडली भरारी पथकाची कारवाई- सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी यावली (ता. मोहोळ) परिसरात स्कॉर्पिओमधून वाहतूक होणारी देशी-विदेशी दारु पकडली.
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान दारुबंदी सप्ताहानिमित्य जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार बुधवारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने दुपारच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील यावली गावाच्या हद्दीत सापळा लावून महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. MH-45-AD-5826 मधून मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 90 मिली क्षमतेच्या 70 सीलबंद बाटल्या व ब्रॅंडीच्या 70 बाटल्या अशी अकरा हजार सहाशे किंमतीची विदेशी दारु वाहतूक करतांना पकडली. वाहनचालक किशोर सावता माळी, वय 34 वर्षे या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एक चारचाकी वाहन व विदेशी दारु असा एकूण रु.सहा लाख अकरा हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक शिवकुमार कांबळे, सुरेश झगडे, जवान अण्णा कर्चे, नंदकुमार वेळापुरे, अशोक माळी व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली. 2 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत दारुबंदी सप्ताहानिमित्य राबविलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 42 गुन्हे नोंदविले असून 3815 लिटर हातभट्टी दारु, 17 हजार 300 लिटर रसायन, 40 लिटर देशी दारु, 35 लिटर विदेशी दारु, 38 लिटर बीअर, 40 लिटर ताडी , 3 चारचाकी व 11 मोटरसायकली असा एकूण पंचवीस लाख सत्यांशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.