आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश; बार्शी उपसा सिंचन योजनेतून लवकरच पाणी! तालुक्यातील सर्व तलाव भरणार, बार्शीकरांची तहान भागणार…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बार्शी उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री महोदयांनी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून बार्शी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या उजनी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांहून अधिक झाला असून, त्यामुळे बार्शी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे बार्शी शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बार्शी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यानंतर गणेश तलाव, राऊत तलाव यांच्यासह तालुक्यातील विविध तलाव भरून घेण्यात येणार आहेत. या तलावांमुळे शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, बार्शीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. त्याचीच फलश्रुती म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यामुळे लवकरच बार्शी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल.
या निर्णयामुळे बार्शी शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच कायमस्वरूपी उपाययोजनांना गती मिळेल, असा विश्वासही आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे. परिणामी, बार्शीकरांना लवकरच सुटकेचा श्वास मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.




