जयंतीनांदेडपुणेमहाराष्ट्र

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम २५ जानेवारीला नांदेड येथे

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य धार्मिक व सामाजिक ऐक्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विविध समाजघटकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाचे प्रतीक असलेल्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहादतीचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार असून, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा उद्देश या आयोजनामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी, भाई कश्मिर सिंघजी, भाई गुरमीत सिंघजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय शीख समाजासह सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदायातील संत, महंत व प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमावेळी महेंद्रजी रायचुरा, विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सरजीत सिंघ गिल यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, क्षेत्रीय समितीचे पदाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाला गती देण्यात आली असून, कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच भाविक व नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button