शिवकुमार ज्वेलर्स लूट प्रकरणाचा छडा; पिस्तूलासह दोन आरोपी अटकेत..

250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 6.30 लाखांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : शहरातील 70 फूट रोड परिसरातील शिवकुमार ज्वेलर्स येथे भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून दोन सोन्याचे नेकलेस लुटणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात दूर झाली आहे. 13 जून 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ॲक्सेस स्कुटीवरून आलेल्या तीन आरोपींनी शिवकुमार ज्वेलर्स दुकानात प्रवेश करून दुकान मालकाला पिस्तूलाचा धाक दाखवत दोन सोन्याचे नेकलेस जबरीने लुटून नेले होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेची चार स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील-सोनवणे आणि तुकाराम घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी घटनास्थळासह शहरातील विविध भागांतील तब्बल 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
दरम्यान, गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की लुटलेले सोन्याचे नेकलेस विक्रीसाठी दोन संशयित अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर परिसरात येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जिलानी रफिक दामटे (वय 33, सध्या रा. 70 फूट रोड, सोलापूर, मूळ रा. येरवडा, पुणे) आणि साहिल उर्फ भाई नबी नंदियाल (वय 24, सध्या रा. सलगरवाडी, सोलापूर, मूळ रा. येरवडा, पुणे) अशी आहेत. झडतीदरम्यान जिलानी दामटे याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक सोन्याचा नेकलेस आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तर साहिल नंदियाल याच्याकडून दुसरा सोन्याचा नेकलेस आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. पोलिसी चौकशीत आरोपींनी रेहान उर्फ जड्डया रमजान लडाफ उर्फ शेख (रा. शाहाबाद, जि. कलबुर्गी, सध्या येरवडा, पुणे) याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तिघांनी मिळून ज्वेलर्स दुकानाची रेकी करून लुटीचा कट रचला होता. गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस दुचाकी त्यांनी एक दिवस आधी कुर्डुवाडी येथून चोरल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी 20 ग्रॅम व 18 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी, देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील-सोनवणे तसेच नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धिरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार तसेच सायबर पोलिस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे आणि फरदिन शेख यांनी पार पाडली.




