पंढरपूरप्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन, प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

दुर्घटनेतील चारही कामगारांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
२५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य पूर्ण, दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विहीर बुजविणार; परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर, (दि. १६) : आंबे (ता. पंढरपूर) येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळून विहिरीत अडकलेल्या चार कामगारांच्या बचावासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेले अभियान तब्बल २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाले. या दुर्घटनेत चारही कामगारांचा मृत्यू झाला असून, घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

आंबे येथे रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विहीर खोदकाम सुरू असताना अचानक माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग तसेच संबंधित बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.500रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. विहिरीतील माती व दगडाचा मोठा ढिगारा आणि निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. बचावकार्यादरम्यान आवश्यक खबरदारी घेत एनडीआरएफच्या पथकाने उपलब्ध साधनसामग्री आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोहीम सुरू ठेवली. अखेर चारही कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

एनडीआरएफ, प्रशासन आणि ग्रामस्थांचे बचावकार्यात समन्वय

या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य केले. जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपदा मित्र, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यासाठी आवश्यक सहकार्य केले. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून ही मोहीम पूर्ण करण्यात आली.

बचाव मोहिमेचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः या ठिकाणी थांबून पार पाडले. तसेच कामगारांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व धीर दिला. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही रात्री एक वाजता आंबे येथे भेट देऊन बचाव मोहिमेची माहिती घेतली.500

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

बचावकार्यादरम्यान रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या कामगाराचा, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या कामगाराचा, तर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौथ्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चारही मृतदेहांचे घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विहीर बुजविणार

या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विहिरीबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या पथकाने दिलेल्या तांत्रिक सल्ल्यानुसार संबंधित विहीर बुजविण्यात येणार आहे. तसेच विहिरीच्या कडेला बॅरिकेडिंग करून परिसर सुरक्षित करण्यात येणार आहे. भविष्यात या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे.500

दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन

या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीमार्फत संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा ढिगारा नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, दुर्घटनेमागील तांत्रिक कारणे कोणती होती, तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या किंवा नाहीत, या सर्व बाबींची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीत कोणाचीही जबाबदारी अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button