भटक्या-विमुक्त जमातीतील मुला-मुलींनी शिक्षणातून प्रगती साधावी – मंत्री संजय राठोड

कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त जमातींच्या वस्त्यांना भेट; समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : भटक्या-विमुक्त जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील मुला-मुलींनी शिक्षणाच्या संधींचा लाभ घेऊन प्रगती साधावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
मंत्री राठोड यांनी आज कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त जमातींच्या वस्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
या भेटीदरम्यान समाजबांधवांना जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्रे मिळविण्यात येणाऱ्या अडचणींसह निवास, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाला आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध होण्याबरोबरच शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.
भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील असून, या समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भाऊबीजेनिमित्त मंत्री राठोड यांच्या हस्ते समाजातील महिलांना शिधा संचांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे उपस्थित होते. तसेच राजपाल राठोड, महादेव चव्हाण, जगन बाबर, परमेश्वर जाधव यांच्यासह भटक्या-विमुक्त जमातींच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व समाजबांधव उपस्थित होते.




