अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ८५० किलो मिठाईचा साठा जप्त; चार आस्थापनांना व्यवसाय बंदचे आदेश , मुख्य पुरवठादाराचा अन्न परवाना, तर एका आस्थापनेची नोंदणी निलंबित

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, (दि. १६) : अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर झोन-१ पथकाने पेढा उत्पादक आणि मिठाई विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ८५० किलो पेढा व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे. तसेच चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, मुख्य पुरवठादाराचा अन्न परवाना आणि अन्य एका आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.
मुख्य मिठाई पुरवठादारावर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार मे. रंगोली स्वीट मार्ट (गट नं. ६७४/१/बी/२, प्लॉट नं. ०५, पिरजादे प्लॉट, अक्कलकोट, जि. सोलापूर; मालक समीर बडेसाहब मकानदार) या आस्थापनेची तपासणी केली. यावेळी अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक, लेबलविषयक नियमांचे उल्लंघन, अन्न सुरक्षा व मानके नियमांतील अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन तसेच मिठाईचा दर्जा निकषांनुसार नसल्याचा संशय आढळून आला.
या ठिकाणाहून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे. कंदी पेढा व स्वीट हलव्याचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
मंदिर परिसरातील १२ दुकानांची तपासणी दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढा व प्रसाद विक्री करणाऱ्या १२ दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान चार अनौपचारिक नमुने घेण्यात आले. तसेच २१ किलो स्वीट हलवा, अंदाजे ७ हजार ३५० रुपये किमतीचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
यामध्ये मे. सलीम मकानदार पेढा स्टॉल येथून ३ किलो स्वीट हलवा (किंमत १ हजार ५० रुपये) जप्त करण्यात आला. या ठिकाणाहून स्वीट हलवा व लेमन पेढ्याचे दोन नमुने घेण्यात आले. मे. रंगोली स्वीट मार्ट येथून १८ किलो स्वीट हलवा (किंमत ६ हजार ३०० रुपये) जप्त करण्यात आला असून, स्वीट हलव्याचा एक नमुना घेण्यात आला. मे. वटवृक्ष स्वामी कृपा स्टोअर्स येथून लेमन पेढ्याचा एक नमुना घेण्यात आला.
याशिवाय मे. गुरुकृपा पूजा भंडार, मे. समर्थ कृपा साहित्य भंडार, मे. साई समर्थ बुक स्टॉल अँड प्रसाद भंडार, मे. पाटील स्वीट शॉप, मे. गुरुदत्त धार्मिक ग्रंथ भंडार, मे. सद्गुरू स्वामी समर्थ धार्मिक भांडार, मे. गुरुलीला पूजा भंडार (बेडर गल्ली), मे. श्री गणेश कॅसेट हाऊस अँड स्वीट मार्ट आणि मे. समर्थ स्वीट स्टॉल या आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली.
चार आस्थापनांना व्यवसाय बंदचे आदेश तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने प्रशासनाने पुढील चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
१. मे. समर्थ स्वीट स्टॉल, स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट. २. मे. पाटील स्वीट शॉप, स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट. ३. मे. रंगोली स्वीट मार्ट, स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट. ४. मे. सलीम मकानदार पेढा स्टॉल, स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट.
याशिवाय मे. रंगोली स्वीट मार्ट, पिरजादे प्लॉट, अक्कलकोट या मुख्य पुरवठादाराचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच मे. गुरुकृपा पूजा भंडार, स्वामी समर्थ मंदिरासमोर, अक्कलकोट या आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सहआयुक्त (अन्न) श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे आणि हिरेमठ यांच्या पथकाने केली.
अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी व कारवाई करण्यात येत असून, अन्नपदार्थांची खरेदी करताना नागरिकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




