महाराष्ट्रसोलापूर

जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कार्यान्वित करण्यात आले असून कार्यालयीन वेळेत ते सुरू राहणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयात प्राप्त झालेल्या ज्या अर्ज, संदर्भ, निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभागप्रमुखांकडे वर्ग केली जाणार असून, संबंधितांनी त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या. यासंदर्भात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर प्रलंबित असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबत शासकीय कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावी लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या दृष्टीने तसेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जाण्यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरेल.

क्षेत्रीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची माहिती

निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी राहणार आहेत. एक नायब तहसीलदार व लिपिकवर्गीय कर्मचारी यांची कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ या कक्षामध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार आहेत. ज्या अर्ज, निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांकडे वर्ग केली जाणार आहेत. संबंधित विभागाने त्यावर केलेल्या कार्यवाहीचा शासन स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाकडून दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button