दुष्काळाच्या संकटात बळीराजाला एकटे पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी,हीच आपली भावनासंकटग्रस्त कुटुंबांतील मुला-मुलींच्या विवाहाचीही जबाबदारी घेणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
पळसप, येरमाळा आणि पारगाव येथे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप
धाराशिव : ‘‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या कष्टावर संपूर्ण समाज उभा आहे.मात्र,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाला सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे.अशा कठीण काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणारा शिधा ही केवळ मदत नसून माझ्या शेतकरी बांधवांप्रती असलेली आपुलकी आणि बहिणींचा अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलला पाहिजे,त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले पाहिजे.यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहोत. दुष्काळाच्या संकटात कोणत्याही शेतकऱ्याला एकटे पडू देणार नाही,’’ अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
आज ३ नोव्हेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील पळसप,कळंब तालुक्यातील येरमाळा आणि वाशी तालुक्यातील पारगाव येथे आयोजित कार्यक्रमांत पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिवाळीच्या सणात आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणींबाबत संवेदनशीलता व्यक्त केली.
पळसप येथील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सरनाईक म्हणाले की,मागील काळात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.आता पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.अशा परिस्थितीत बळीराजाला दिलासा देणे आणि त्याच्या संसाराला आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सधन झाला पाहिजे. त्याच्या कष्टाला योग्य फळ मिळाले पाहिजे.कोणताही गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास कालपासून सुरुवात झाली असल्याचे सांगून सरनाईक म्हणाले की, दिवाळीनंतर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचावी आणि त्यांना संकटातून सावरण्यासाठी बळ मिळावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत
धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की,राज्यात सर्वांत कमी पाणीसाठा धाराशिव जिल्ह्यात आहे.त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधनासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आवश्यक तो आधार देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये;आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणि मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. ते म्हणाले की,संकट कितीही मोठे असले तरी कोणत्याही शेतकऱ्याने भावनेच्या भरात टोकाचा निर्णय घेऊ नये.अडचणींच्या काळात खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे.शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. बळीराजा सुखी आणि समाधानी राहावा,हीच आपली भावना आहे.
शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींच्या विवाहाची जबाबदारी घेणार
दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांपुढे मुला-मुलींच्या विवाहाचा खर्च हाही मोठा प्रश्न असतो.ही बाब लक्षात घेऊन अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींच्या विवाहाची जबाबदारी आणि त्यासाठी लागणारा खर्च आपण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दुष्काळामुळे कोणत्याही कुटुंबाच्या मुला-मुलींच्या विवाहात आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पळसप येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर,अजित पिंगळे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येरमाळा येथेही शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा शिधा
पळसप येथील कार्यक्रमाप्रमाणेच येरमाळा येथेही दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीच्या शिधावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना शिध्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी आमदार ज्ञानराज चौगुले,अजित पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ,अनंत लंगडे आणि रामकृष्ण कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित पिंगळे यांनी केले.येरमाळा व परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
वाशी तालुक्यातील पारगाव येथेही पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला पारगाव व परिसरातील शेतकऱ्यांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी अजित पिंगळे,जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ आणि अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पळसप,येरमाळा आणि पारगाव या तिन्ही ठिकाणी झालेल्या शिधावाटप कार्यक्रमांतून दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मदतीचा हात देण्यात आला.पाणीटंचाई,चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीतील उत्पन्नावर झालेला परिणाम अशा अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.दिवाळीचा सण हा केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या जीवनात दिलासा निर्माण करणारा ठरावा,ही भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले.




