दिवाळीचा शिधा ही मदतीची केवळ सुरुवात ; संकटग्रस्त कुटुंबांना भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही बहिणींना भावाची दिवाळी भेट

सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांनाही मदतीचा हात देणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव,दि.३ नोव्हेंबर : गेल्या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून नेल्या,तर यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि शेतमजुरांसमोर जगण्याचा संघर्ष उभा राहिला आहे.अशा कठीण परिस्थितीत गोरगरीब कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये, त्यांच्या घरातही आनंदाचा दिवा उजळावा,या भावनेतून दिवाळीच्या शिधावाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.ही मदत म्हणजे केवळ दिवाळीची भेट नसून संकटग्रस्त शेतकरी,शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबांना भविष्यातही करण्यात येणाऱ्या सहकार्याची सुरुवात आहे.दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शेतकरी आणि शेतमजुरांना एकटे पडू देणार नाही.त्यांच्या पाठीशी शासन आणि आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे २ नोव्हेंबर रोजी आयोजित दिवाळी शिधावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष श्रीमती.उषा गायकवाड, पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षा चौगुले,उमरगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की,मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या.शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच यंदा अत्यल्प पावसामुळे पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.सलग दोन वर्षे नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.मागील वर्षी पूरग्रस्तांना स्वतःच्या खर्चातून १०१ घरांचे वाटप केले होते. संकटग्रस्तांना जेवढी मदत करता येईल,तेवढी करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असतो. दिवाळीनिमित्त सुरू केलेले शिधावाटप हे याच मदतकार्याचा एक भाग आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून सरनाईक म्हणाले की, दुष्काळामुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.विशेषतः गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना दिवाळीचा सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी आपल्या बहिणींच्या घरात दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा,या भावनेतून शिधावाटप करण्यात येत आहे. ही बहिणींना भावाकडून दिलेली छोटीशी दिवाळी भेट आहे. बहिणींनी ही भेट आनंदाने स्वीकारावी.आज केलेली मदत ही केवळ सुरुवात असून, भविष्यातही शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल,असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सरनाईक म्हणाले की, आता पाऊस केव्हा पडेल,याची शाश्वती राहिलेली नाही. जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये अत्यंत कमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. माणसांबरोबरच गुराढोरांनाही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले पाहिजे.त्यासाठी शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या गरजांसाठी पाणी राखीव ठेवावे लागणार आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे.शेतकरी व शेतमजुरांनी कोणतेही टोकाचे किंवा नकारात्मक विचार मनात आणू नयेत. संकटाला घाबरून न जाता सर्वांनी एकजुटीने त्याचा सामना करावा.शासनाकडून मदत करण्यात येत असून,भविष्यात शेतीसाठीही आवश्यक मदत केली जाणार आहे.असे त्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा उल्लेख करताना सरनाईक म्हणाले की,शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंबांसमोर मुलामुलींच्या लग्नकार्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये लग्नकार्य असेल आणि त्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील,अशा कुटुंबांना निश्चितपणे मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी सहकार्य करण्यात येईल. कोणत्याही शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकटामुळे मोठी अडचण येऊ नये,याची काळजी घेतली जाईल.शक्य तेवढी सर्व मदत करण्याची आपली भूमिका आहे. संकटाच्या काळात एकमेकांना आधार देणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की,यंदा भीषण दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजुरांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये,त्यांच्या कुटुंबांनाही सणाचा आनंद घेता यावा,यासाठी दिवाळी शिधावाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडूनही मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संतोष पोतदार,विजय पटवर्धन,बिल्लू चव्हाण,रामचंद्र पवार,भीम कांबळे,लक्ष्मण अडगे,राजेंद्र सगर,विमल पाटील,भानुदास जमादार,पार्वती स्वामी,रणवीर भगत,संभाजी माने,नेताजी खंडागळे आणि शालूताई ठिकाणे यांना प्रातिनिधिक स्वरूपात दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या मदत उपक्रमांतर्गत येणेगूर परिसरातील गावांमधील गरजू कुटुंबांनाही दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मदतीचा हात मिळणार आहे.




