दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

परगावी जाताना घरातील दागिने व पैसे सुरक्षित ठेवा; अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. सणाच्या काळात अनेक नागरिक खरेदीसाठी तसेच गावी किंवा परगावी जात असल्याने चोरी, फसवणूक आणि इतर अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना विविध सुरक्षा उपाययोजना पाळण्याचे आवाहन केले आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरातील पैसे, दागिने उघड्यावर ठेवू नयेत. शक्यतो मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात. आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी, जेणेकरून घरावर लक्ष ठेवता येईल.
प्रवासादरम्यान महिलांनी दागिने घालून जाणे टाळावे. तसेच अनोळखी व्यक्तींकडून दिले जाणारे खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ स्वीकारू नयेत. त्यामध्ये गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासात अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
बस किंवा गर्दीच्या ठिकाणी चढताना-उतरताना पाकीट, पर्स आणि बॅग यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. व्यापारी, दुकानदार आणि सराफ व्यावसायिकांनीही दुकानातील सुरक्षेची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची खात्री करावी.
दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अक्षय सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बार्शी तालुका पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“सुरक्षित राहा… सुखरूप राहा… हीच पोलिसांची अपेक्षा!”




