गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; ३०.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचगाव टोलनाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्य आणि बिअरची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने इचगाव टोलनाक्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत २३८ बॉक्समधील विदेशी मद्याच्या ३ हजार ८८८ बाटल्या, बिअरच्या २६४ बाटल्या आणि टाटा कंपनीचे इंट्रा वाहन असा एकूण ३० लाख ९१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एक गुन्हा दाखल करून दोघांवर कारवाई करण्यात आली.
३१ ऑक्टोबर रोजी मिरज-सोलापूर महामार्गावरील इचगाव टोलनाका, ता. मोहोळ येथे ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
जप्त केलेल्या मुद्देमालात ७५० मिली व १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्याच्या ३ हजार ८८८ बाटल्या, तसेच बिअरच्या २६४ बाटल्यांचा समावेश आहे. यामध्ये २ हजार ६८ ब. ली. विदेशी मद्य आणि १३२ ब. ली. बिअर जप्त करण्यात आली.
सात महिन्यांत १० कोटींचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबविली. या कालावधीत एकूण १ हजार ८२५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १ हजार ९२५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेत ६ लाख ७२ हजार ८६६ लिटर रसायन, ४८ हजार ६९२.५ लिटर हातभट्टी दारू, ९ हजार ३३८.१७ लिटर परराज्यातील मद्य व बिअर, १० हजार ६५८.८ ब. ली. ताडी, ३ लाख ३१ हजार ४९० रिकाम्या बाटल्या, १ लाख ३३ हजार १६० बनावट बुचे, १ लाख ५५ हजार ४०० बनावट लेबल आणि १३ हजार ८०० लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले.
याशिवाय १८२ वाहने जप्त करण्यात आली असून, वाहनांसह एकूण १० कोटी २२ लाख ९७ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जागा मालकांवरही कारवाईचा बडगा
अवैध ढाब्यांवर मद्यविक्री करणे, बेकायदा मद्यनिर्मिती, वाहतूक आणि मद्याचा साठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागांच्या मालकांनाही या कारवाईत आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध मद्यव्यवसायाला जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जे. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, जवान अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग आणि स्वप्नील यरमाळ यांनी परिश्रम घेतले.
विषारी बनावट दारूपासून सावध राहण्याचे आवाहन
पुणे येथे मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विषारी दारूच्या सेवनामुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे तसेच अकाली मृत्यू होण्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त मद्याच्या आमिषाला बळी पडू नये, अनधिकृत ठिकाणांहून मद्य खरेदी करू नये आणि अवैध मद्याबाबतची माहिती विभागाला द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.




