महाराष्ट्रयोजनासोलापूर

महा-उपलब्धी’ अॅपमुळे निवृत्तीवेतनविषयक सेवा मोबाईलवरच उपलब्ध, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांचा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा व माहिती अधिक सुलभपणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागामार्फत ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेत लेखा व कोषागारे विभागाच्या सचिव श्रीमती रिचा यागला तसेच संचालक, लेखा व कोषागारे श्रीमती दीपा देशपांडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. ‘महा-उपलब्धी’ अॅपच्या विविध सुविधा, त्याचा वापर करण्याची पद्धत तसेच डिजिटल माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक सेवा प्राप्त करण्याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
निवृत्तीवेतनधारकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असल्याने कार्यशाळेचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले. प्रत्येक सत्रात सुमारे ४०० निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अॅपबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली तसेच विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील विविध निवृत्तीवेतनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. ‘महा-उपलब्धी’ अॅप तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी आयोजित कार्यशाळेबाबत संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. निवृत्तीवेतनविषयक सेवा डिजिटल माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त व सोयीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.500अॅपवर नोंदणी न झाल्यास निवृत्तीवेतन सेवांवर परिणाम नाही
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वैभव राऊत यांनी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना आवाहन केले की, तांत्रिक अडचणींमुळे किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसल्यामुळे एखाद्या निवृत्ती वेतनधारकास ‘महा-उपलब्धी’ अॅपवर नोंदणी करता आली नाही, तरी त्यांची निवृत्तीवेतनाशी संबंधित कोणतीही सेवा बंद होणार नाही किंवा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. निवृत्तीवेतनविषयक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहतील.
अॅपवर नोंदणी न झाल्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच निवृत्तीवेतनासंदर्भात अनधिकृत स्रोतांकडून अथवा अप्रमाणित माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालय किंवा तालुका उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन सहायक संचालक रोहन जाधव, परिविक्षाधीन सहायक संचालक नितीन कानवट, अपर कोषागार अधिकारी रणजित कदम, रामकृष्ण डंके, निलेश साखरे यांच्यासह जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग, विविध निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यशाळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. निवृत्तीवेतनविषयक सेवा डिजिटल माध्यमातून अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘महा-उपलब्धी’ अॅप हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button