दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना बार्शी तालुका पोलिसांकडून अटक; घातक शस्त्रे व दोन दुचाकी जप्त
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक करत घातक शस्त्रे, मिरची पावडर आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ४० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १२.२० वाजण्याच्या सुमारास कोरफळे ते यमाई जाणाऱ्या रस्त्यालगत मौजे कोरफळे येथील सोमनाथ शेरखाने यांच्या शेताजवळ संशयितांची हालचाल आढळून आली. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पप्पू शहाजी शिंदे (३९), आकाश बाशा भोसले (३०), बापू शहाजी शिंदे (६०), मनोज बापू शिंदे (१९) हे सर्व रा. लाडोळे, ता. बार्शी तसेच इनामदार श्रीमंत भोसले (३५), रा. तांबेवाडी, ता. बार्शी यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून एक कुऱ्हाड, एक धारदार कोयता, एक लोखंडी कटावणी, पाच पाकिटे मिरची पावडर, एक स्क्रू ड्रायव्हर तसेच होंडा शाईन (एमएच-१३-ईटी-६२८३) आणि हिरो एचएफ डिलक्स (एमएच-१३-डीबी-६०१५) या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप रामेश्वर जगताप यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






