गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात, सामाजिक सलोखा जपत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन बार्शी शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व शांतता कमिटी सदस्यांची संयुक्त बैठक कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, पांडे चौक येथे आयोजित करण्यात आली.
बैठकीस विजय कबाडे (अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), सुहास जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी), एफ. आर. शेख (तहसीलदार, बार्शी), तैमूर मुलाणी (मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद), विक्रांत चव्हाण (सहाय्यक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग) आणि आनंद उपरे (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शांतता कमिटी सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार, डीजे-डॉल्बी व मंडप व्यावसायिकांसह सुमारे ४०० ते ५०० नागरिकांनी सहभाग घेतला.
बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सामाजिक सलोखा राखणे आणि सर्व मंडळांनी आवश्यक परवानग्या ऑनलाइन पद्धतीने घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
‘गणराया अवॉर्ड’ची घोषणा
बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीतील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘गणराया अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, ध्वनिप्रदूषणमुक्त मिरवणुका, स्वच्छता, शिस्त, सामाजिक सलोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे.
‘No DJ, No Dolby’ उपक्रमावर भर
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘No DJ, No Dolby’ उपक्रमाला यावेळी विशेष महत्त्व देण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे व डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
मंडप उभारताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आक्षेपार्ह देखावे, बॅनर, होर्डिंग किंवा धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे साहित्य प्रदर्शित करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या.
सुरक्षा व सामाजिक जबाबदारीचे आवाहन
प्रत्येक गणेश मंडळाने मंडप परिसरात CCTV कॅमेरे बसवावेत आणि गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, असे आवाहन करण्यात आले. जबरदस्तीने वर्गणी किंवा देणगी मागू नये, तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शालेय स्पर्धा आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा
गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा संदेश प्रसारित करू नयेत. जातीय सलोखा आणि शांतता कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बार्शी शहर पोलिसांनी सर्व गणेशोत्सव मंडळे, नागरिक, व्यावसायिक आणि संबंधित घटकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून “शांतता, शिस्त, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२६” साजरा करण्याचे आवाहन केले.





