कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन आज सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली.
रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉलमधील डॉ. सुनंदा म.गोसावी आर्ट गॅलरीत आजपासून छायाचित्र प्रदर्शन सुरू झाले. ते 30 ऑगस्ट, 2026 पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
उदघाटन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आमदार सरोज अहिरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत भक्ती चरणदास महाराज यांच्यासह रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर, सचिव हर्षद बेळे, कार्यकारी सचिव अभिषेक व्यास, नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश काळे, सचिव प्रशांत खरोटे, सतीश देवगिरे, अशोक गवळी, नीलेश तांबे, अंबादास शिंदे, हेमंत घोरपडे, विवेक बोकील, भूषण पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
या प्रदर्शनात सिंहस्थ कुंभमेळ्यांतील दुर्मिळ, अप्रकाशित छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. सन १९३२ पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आठवणींचा अमूल्य ठेवा या छायाचित्रांमधून उलगड्यात आला आहे. बदलते नाशिक, साधू-संतांचे आखाडे, शाही स्नानाची परंपरा, भाविकांचा महासागर, धार्मिक विधी, तत्कालीन सामाजिक जीवन, कुंभमेळ्याचे बदलते स्वरूप या छायाचित्रांतून पाहावयास मिळणार आहे.





