फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट असल्याचे सांगून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बार्शी पोलिसांची २ तासांत धडक कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ५ ऑगस्ट : बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत जबरी चोरी (रॉबरी) प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मारहाण करून लुटलेली रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेश नरहरी चव्हाण (रा. बाभूळगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हे लातूरहून येरमाळा मार्गे बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसळंब गावाजवळ आले असता दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मोटरसायकलला धडक देऊन खाली पाडले.
त्यानंतर आरोपींनी स्वतःला श्रीराम फायनान्सचे रिकव्हरी एजंट असल्याचे सांगत, “मोटरसायकलचे हप्ते का थकवले? ताबडतोब ५० हजार रुपये द्या, नाहीतर मोटरसायकल घेऊन जाऊ,” अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी मोटरसायकल ही भावाच्या कामगाराची असल्याचे सांगून फोन करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. तसेच दगड उचलून डोक्यात मारण्याची धमकी देत खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि मोबाईल फोडून नुकसान केले. त्यानंतर दोघेही मोटरसायकलवरून पसार झाले.
या गंभीर रॉबरी प्रकरणाची तक्रार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपास सुरू केला. आरोपींनी वापरलेल्या मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे गुन्हे शोध पथकाने जलद हालचाली करत अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना शोधून काढले आणि अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : ऋषिकेश सुनील साठे (रा. भवानी पेठ, बार्शी) मुजम्मिल रियाज सय्यद (रा. मंगळवार पेठ, बार्शी) दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अटक करण्यात आली असून आज त्यांना माननीय न्यायालयात पोलिस कोठडीसाठी हजर करण्यात येणार आहे.
बार्शी तालुका पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे स्वतःला रिकव्हरी एजंट सांगून जर कोणाकडून रोख रक्कम उकळण्यात आली असेल किंवा फसवणूक करण्यात आली असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपींकडून यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे करीत आहेत.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, राजेंद्र मंगरुळे, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गणेश साठे, आकाश कांबळे, सतुल बाकले आणि मारुती शेलार यांनी सहभाग घेतला.




