वेैराग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; एका रात्रीत ४ गंभीर गुन्ह्यांची उकल, २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करत एका रात्रीत घडलेल्या चार गंभीर चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील एकूण १५ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दि. १९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री मौजे धामणगाव (ता. बार्शी) येथे बालासाहेब गुरुनाथ देवकणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटी फोडून २६ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ₹७२,८००) लंपास केले. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी दुपारी धामणगाव येथील अजय बालासाहेब गरड यांच्या घरासमोर उभी असलेली युनिकॉर्न मोटारसायकल (किंमत ₹६५,०००) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबतही वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याच रात्री पहाटे शेळगाव (आर.) येथे ज्ञानदेव नामदेव गायकवाड यांच्या घरासमोरील गोठ्यातून ७ शेळ्या व २ बोकड, असा ₹४२,००० किमतीचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणाचाही तपास वैराग पोलिसांनी हाती घेतला.
एका रात्रीत सलग तीन गंभीर गुन्हे घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक अमुल कादवाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान चरण बाळाजी शिंदे (रा. काटी, ता. तुळजापूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत साथीदारांची माहिती समोर आली. यानंतर चोरीस गेलेल्या मोटारसायकली, दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर वैराग पोलिसांनी खालीलप्रमाणे गुन्ह्यांची उकल केली असून यामध्ये वैराग पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे, तुळजापूर पोलीस ठाण्यातील १ गुन्हा, धाराशिव जिल्ह्यातील १ गुन्हा याशिवाय आंतरजिल्हा पातळीवरील १० गुन्हे अशा एकूण १५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत घरफोडीतून मिळालेली ₹१०,००० रोख रक्कम, युनिकॉर्न मोटारसायकल – ₹६५,०००, चोरीस गेलेल्या शेळ्या – ₹४२,०००, तुळजापूर येथील चोरीतील युनिकॉर्न मोटारसायकल – ₹६०,०००, एचएफ डिलक्स मोटारसायकल – ₹४०,०००, आणखी एक एचएफ डिलक्स मोटारसायकल – ₹३०,००० असा एकूण ₹२,२३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक अमुल कादबाने, पोउपनि. विक्रम वडणे, पोहेकॉ. अभिजित गाटे, संदेश पवार, अमोल भोरे, सुखदेव सलगर, संकेत माळी, अमर गुरव, समीर पठाण, श्रीमंत शिंगाडे तसेच सायबर सेलचे पो.कॉ. राहुल सोनकर यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलिसांनी उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू ठेवला असून, आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





