सामाजिक बांधिलकी जपणारं पाऊल: बालाजी माळींचा उद्या वाढदिवस; विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव एवढ्यापुरताच मर्यादित न राहता तो समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ठरावा, या उदात्त विचारातून युवा उद्योजक बालाजी माळी यांनी यंदाचा वाढदिवस “सेवा दिन” म्हणून साजरा करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.
डीवायएसपी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत, “जन्मदिवस सेवा दिन म्हणून साजरा करा” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
२७ जुलै, सोमवार रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री भगवंत मंदिर येथे दर्शनाने होईल.
त्यानंतर सकाळी ९ वाजता भरती व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता श्री भगवंत मंदिर येथे गरजूंसाठी भोजन वाटप करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता खांडवी येथील मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
यानंतर मित्रपरिवारासोबत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येईल. दुपारी ४ वाजता वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाईल. तसेच वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करून त्यांच्यासोबत संवाद साधण्यात येणार आहे.
दिवसभरातील सामाजिक उपक्रमांनंतर सायंकाळी ८ वाजता हायवे स्टॉप, होनराव प्लॉट, बार्शी येथे सामूहिक वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वीकारावा, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसून समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी आहे. सेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेची जपणूक यांमधूनच वाढदिवसाचे खरे सार्थक होते,” असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.





