वारी व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 53 गुन्हेगारांवर धडाकेबाज प्रतिबंधक कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आगामी आषाढी वारी तसेच विविध सण-उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावेत, या उद्देशाने बार्शी तालुका पोलीस स्टेशनने रेकॉर्डवरील, ‘टू प्लस’ व सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज प्रतिबंधक कारवाई करत एकाच दिवशी 53 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई केली.
अतुल कुलकर्णी व विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाईची मालिका सुरू केली आहे.
या मोहिमेचा उद्देश रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांमध्ये कायद्याबाबत आदर निर्माण करून त्यांना पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्यापासून परावृत्त करणे, तसेच आषाढी वारी व आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हा आहे. त्याच अनुषंगाने आज एकूण 53 आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई प्रभारी अधिकारी सपोनी अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, आबासाहेब शिरगिरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर तसेच बीट अंमलदार सदाशिव गवळी, सोमनाथ खांडेकर, अरुण डुकळे, प्रदीप चौधरी, गणेश दळवी तसेच बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई सातत्याने सुरू असून, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




