‘अमृत’ची आता हरित उर्जा क्षेत्राकडे वाटचाल : राज्यभर ‘अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन’ उभारणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “Go Green India” व “सस्टेनेबल मोबिलिटी” संकल्पनेला बळ देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे ने हरित ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘अमृत’च्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे.
युवक, महिला व ग्रामीण उद्योजकांना संधी
या उपक्रमांतर्गत युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई घटक तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्याने पेट्रोल पंपाप्रमाणे ईव्ही चार्जिंग स्टेशनचे मोठे जाळे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.
व्यवसायातील विविध संधी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही संबंधित तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल व्यवसाय तसेच ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ईव्ही क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक ठरणार असल्याने प्रशिक्षित उद्योजकांना मोठा लाभ मिळणार आहे.
प्रशिक्षण ते आर्थिक सहाय्य ‘अमृत’च्या या विशेष उपक्रमांतर्गत सहभागी लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. भारतीय स्वदेशी कंपन्या व तज्ञ मार्गदर्शक यांच्या सहाय्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना ‘अमृत’च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ मिळणार आहे.
पात्रता व अर्ज प्रक्रिया युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक या उपक्रमासाठी पात्र राहतील. इच्छुक उमेदवारांनी ‘अमृत’च्या http://mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ‘योजना’ विभागातील ‘विशेष योजना’ मेनू खाली ‘EV Charging Station Partner’ मध्ये ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. संकेतस्थळावर सर्व जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.
हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायामुळे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळून हरित ऊर्जा वापर वाढेल. युवक, महिला व ग्रामीण उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक जबाबदारीतून ‘अमृत’ने हा अनोखा उपक्रम हाती घेतला असून, यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत, असे ‘अमृत’कडून सांगण्यात आले.





